
गडचिरोली (प्रति)चामोर्शी तालुक्यातील स्थलांतरीत व गरजू लोकांची वाढती संख्या व अचानक आलेल्या मागणी वेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्वत: ४६ किराणा कीट देवून मदत केली. शनिवारी जिल्हा टीमकडे चामोर्शी तहसिलदार यांच्याकडून गरजू लोकांना मदत करणे करीता तातडीने मागणी आली. यावेळी विविध सामाजिक संस्थांनी दिलेली मदत वाटप करून झालेली होती. अशा वेळी तात्काळ मदत लागल्याने त्यांनी स्वत: जिल्हा टिमकडे ४६ किराणा किट खरेदी करण्यासाठी पैसे दिले. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा सह तुमडी, नवेगाव माल, दोटकुली, मधोली चक या ठिकाणी नव्याने मदत मागण्यात आली. यावेळी संबंधित ठिकाणी मदत म्हणून जिल्हाधिकारी सिंगला यांनी स्वत: पुढे येवून मदत केली. याच बरोबर सर्व स्थलांतरीतांना प्रशासनाकडून मदत देणेबाबत प्रशासनाला सूचना केल्या. परंतू जिल्ह्यातील संचार बंदीमुळे स्थानिक गरजूंनाही मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे.
यावेळी विविध सामाजिक संस्था, मित्र समूह व व्यक्तींनी वेगवेगळया प्रकारे सहकार्य केले आहे. यापुढेही अशा गरीब व गरजू लोकांना सहकार्य करून सामाजिक बांधिलीकी जपण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी कले आहे. जिल्ह्यातील अनेक गरजू लोकांना मदतीचा हात हवा आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. अशावेळी गोरगरीबांना मदत मिळणेही तितकेच गरजेचे आहे. म्हणून जसे जमेल तशा प्रकारे पुढे येवून लोकांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवून सहकार्य, करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले.


