बुलडाणा (मवृसे)कोरोना विषाणूने शहरातील एकाचा बळी घेतल्यानंतर कोरोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रविवार, ५ एप्रिल रोजी आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या खामगाव, देऊळगाव राजा प्रत्येकी १ व चिखली येथील २ जणांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा संख्या आता ९ झाली असून, यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एकूण ३० जण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. यापैकी तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. १२ नमुने निगेटिव्ह आले असून, १५ नमुने अद्याप प्रलंबित आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातून ५ मार्चपासून आजपर्यंत एकूण ८३ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ६३ जणांचे स्वॅब नमुने प्राप्त झाले आहेत. कालपर्यंत ही संख्या ५३ होती. दरम्यान, यापैकी पाच जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता तर अन्य चार जण हे मृत व्यक्तीच्या निकट संपर्कातील होते. ते सध्या आयसोलेशन कक्षात आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे शनिवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसगाबाबत संदिग्ध म्हणून गणल्या गेलेल्या ११२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी शंका आलेल्या ८३ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते. त्यातील २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यातील १२ नागरिक हे आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. यातील ७ जण बुलडाणा येथील, ३ जण खामगाव येथील तर २ जण शेगाव येथील आयसोलेशन कक्षात आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.



