➤ मोटारसायकल चोर जेरबंद, चोरीच्या तीन दुचाकी जप्त ; रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ₹७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.नेहरूनगर चौक परिसरातून २६ जून रोजी हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून माहिती संकलित केली. दरम्यान, बंगाली कॅम्प परिसरात एक इसम चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रशांत राजकुमार करमनकर (वय ३१, रा. समाधी वॉर्ड, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने कसून चौकशीनंतर मोटारसायकल चोरीची कबुली दिली.आरोपीच्या सांगण्यावरून डब्ल्यूसीएल रेती बंकर परिसरातून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये फिर्यादीची चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच आणखी दोन विना क्रमांकाच्या दुचाकींचा समावेश असून, जप्त वाहनांची एकूण किंमत ₹७० हजार आहे.या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून आणखी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.




