Uncategorized

गोयेगाव फाट्यावरील अप्रोच रोडची दुरावस्था. चिखल, खड्डे, ओव्हरलोड कोळसा वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

गोयेगाव फाट्यावरील अप्रोच रोडची दुरावस्था.

चिखल, खड्डे, ओव्हरलोड कोळसा वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

राजुरा :

तालुक्यातील गोयेगाव फाट्याजवळ रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी तात्पुरता अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि ओव्हरलोड वाहनांची सततची वर्दळ यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तात्काळ याची दखल घेण्यात यावी अशी मागणी माथराचे प्रशासकीय सरपंच हरिभाऊ झाडे यांनी केले आहे.

या मार्गावर कोळसा खाणीतील ओव्हरलोड ट्रक दिवस-रात्र धावत असतात. अनेक वाहनांवर ताडपत्री नसल्याने कोळशाची धूळ उडत असून वाहनांना रिफ्लेक्टरही नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. शिवाय, अनेक ट्रक रस्त्याच्या कडेला कुठेही उभे केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, रेल्वे पुलाचे काम सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठेही डायव्हर्जनचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे बाहेरून येणारे वाहनचालक गोंधळून जात आहेत. पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन अप्रोच रोडची तातडीने दुरुस्ती करावी, चांगल्या दर्जाचा पर्यायी रस्ता तयार करावा, आवश्यक त्या ठिकाणी डायव्हर्जन फलक लावावेत आणि ओव्हरलोड कोळसा वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *