➤ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात आंदोलन; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न

चंद्रपूर : दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज २३ जुलै रोजी चंद्रपुरात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. शहरातील बायपास रोडवरील तेलंगणा–महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम करण्याचा प्रयत्न करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती चिघळू नये आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना समजावले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
या आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत संबंधितांवर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.




