➤ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाहीत काँग्रेसचे आंदोलन

सिंदेवाही : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आ. वडेट्टीवार म्हणाले, लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे हे लोकशाही मूल्यांना धरून नसून, संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे ही चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी, पिकांना न मिळणारा हमीभाव, वाढता उत्पादन खर्च, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील समस्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील विलंब आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांची दुरवस्था यांसारख्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले. सरकारने या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा काँग्रेस राज्यभर जनआंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच दिल्लीतील जंतर-मंतरवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.




