चंद्रपुर

६५ अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांचा दणका; पालकांना समुपदेशन, पुन्हा गुन्हा झाल्यास कठोर कारवाईचा इशारा

६५ अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांचा दणका; पालकांना समुपदेशन, पुन्हा गुन्हा झाल्यास कठोर कारवाईचा इशारा

चंद्रपूर, दि. १५ जुलै : शहरातील वाढते अपघात, अल्पवयीनांकडून होणारी भरधाव वाहनचालक व स्टंटबाजी याला आळा घालण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवून ६५ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली. या मोहिमेत त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर संबंधित पालकांना वाहतूक पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले. तसेच पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा आढळल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

मंगळवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत शहरातील विविध प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. या कारवाईत ६५ अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळून आली. त्यांच्या ताब्यातील वाहने जप्त करण्यात आली.

यानंतर सायंकाळी वाहतूक पोलीस ठाण्यात पालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी पालकांना अल्पवयीन मुलांच्या वाहनचालकाबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देत समुपदेशन केले. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल पारापात्रे यावेळी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक नोपाणी यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांच्या हट्टापोटी त्यांच्या हातात वाहन देणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलाकडून वाहन चालविताना गुन्हा घडल्यास संबंधित पालकांवर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहिती त्यांनी पालकांना दिली.

प्रथमच गुन्हा आढळल्याने प्रत्येक पालकाकडून ५०० रुपयांचा दंड आकारून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आणि वाहने परत करण्यात आली. मात्र, यापुढे संबंधित अल्पवयीन मुलांकडून पुन्हा वाहन चालविताना आढळल्यास पालकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.

१८ वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि वैध वाहन परवाना मिळेपर्यंत मुलांच्या हातात वाहन देऊ नये, असे आवाहन चंद्रपूर पोलीस प्रशासनाने केले आहे. या धडक मोहिमेमुळे शहरातील अल्पवयीन वाहनचालक आणि त्यांच्या पालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *