चंद्रपुर

गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २१ लाखांच्या गुन्ह्यात तीन आरोपी जेरबंद

गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २१ लाखांच्या गुन्ह्यात तीन आरोपी जेरबंद

चंद्रपूर, दि. १५ जुलै : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि पडोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत २१ लाख रुपयांच्या गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचे ३४२ गॅस सिलिंडर आणि सिलिंडर विक्रीतून मिळालेली २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडोली पोलीस स्टेशन हद्दीतील एमआयडीसी खुटाळा परिसरातील गॅस बॉटलिंग प्लांटसमोरील रस्त्यावर उभा असलेला अशोक लेलंड कंपनीचा ट्रक (क्र. एमएच-३४ बीजी-१६००) अज्ञात चोरट्यांनी १२ जुलै रोजी चोरून नेला होता. ट्रकमध्ये ३३२ घरगुती व १० कमर्शियल गॅस सिलिंडर असा सुमारे २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक वैभव विनोद खांडरे (रा. समाधी वॉर्ड, जेल रोड, चंद्रपूर) यांच्या तक्रारीवरून पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व पडोली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सखोल तपासाच्या आधारे राजेंद्र रामचंद्र काळे (रा. बांढरी फाटा, पडोली), कुणाल सुभाष घुरुडे (रा. म्हाडा कॉलनी, दातळा) आणि मोहित पोतदार (रा. मुलचेरा, जि. गडचिरोली) यांना निष्पन्न करून ताब्यात घेतले.

आरोपींच्या चौकशीत पोलिसांनी ८२ भरलेले घरगुती सिलिंडर, २५० रिकामे घरगुती सिलिंडर, १० भरलेले कमर्शियल सिलिंडर तसेच चोरीचे सिलिंडर विकून मिळालेली २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड जप्त केली. उर्वरित मुद्देमालाबाबतही तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि. योगेश विसे, सपोनि. दीपक कंकरेद्वार, पोउनि. विनोद भुरले, पोउनि. सुनील गौरकार, पोउनि. देवानंद केकान (पडोली), तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *