५८ कोटींची पाणी योजना ठरली निष्प्रभ; पाण्यासाठी महिलांची भटकंती, संतप्त महिला नगर परिषदेत धडकल्या

चिमूर : प्रतिनिधी
चिमूर शहरातील नेताजी वार्डात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ५८ कोटी रुपयांच्या भव्य पाणीपुरवठा योजनेचा गाजावाजा होत असतानाही नागरिकांना पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने संतप्त महिलांनी अखेर नगरसेविका वनिता मगरे यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन छेडले.
नेताजी वार्डातील महिलांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जवळपास एक तास ठिय्या आंदोलन केले. “कोट्यवधी रुपयांची पाणी योजना नेमकी कोणासाठी?” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. वार्डातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महिलांना घरातील कामे, लहान मुले आणि दैनंदिन जीवन सांभाळत पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका वनिता मगरे यांनी सांगितले की, या गंभीर समस्येबाबत नगर परिषदेला अनेक वेळा निवेदने देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांचा संयम सुटला असून महिलांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
महिलांचा आक्रोश पाहता नगराध्यक्ष गीता लिंगायत यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन महिलांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित भागात प्रत्यक्ष जाऊन पाणीपुरवठ्याची पाहणी केली व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करून समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे आदेश दिले. मात्र, अनेक आश्वासने आणि आदेशांनंतरही नेताजी वार्डातील पाणी प्रश्न अद्याप पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याने प्रशासन आता किती गांभीर्याने कारवाई करते, याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




