चंद्रपुर

➤ पावसाने दगा दिला, कपाशी करपली; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पावसाने दगा दिला, कपाशी करपली; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट: तालुक्यातील शेतकरी हतबल

राजुरा :

मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसामुळे आशावादी झालेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची धूळपेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांतील कपाशीचे बियाणे जमिनीतच करपले आहे. परिणामी राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दोन-तीन दिवस हलक्या सरी कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली. पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र चार-पाच दिवसांपासून पावसाने पूर्णतः दडी मारल्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली नाही. परिणामी अनेक ठिकाणी कपाशीचे कोंब जमिनीतून बाहेर येण्यापूर्वीच करपल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, कढोली, मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, घिडशी, माथरा, गोयेगाव आणि अंतरगाव परिसरात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. महागडे बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च करूनही पाऊस न आल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे.
बदलत्या हवामानामुळे शेतीचे नियोजन अधिकच कठीण बनले आहे. कर्ज आणि उसनवारी करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा दुबार पेरणीसाठी आर्थिक जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे नव्या संकटाची भर पडली आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता

दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगल्या उत्पादनाच्या आशेने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र ऐन सुरुवातीलाच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता दाटली आहे. दुबार पेरणीचा खर्च, वाढती उत्पादनखर्चाची समस्या आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *