चंद्रपुर

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चंद्रपुरात जोरदार पाठिंबा; पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चंद्रपुरात जोरदार पाठिंबा; पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

चंद्रपूर – लद्दाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच पेपर फुटीच्या घटनां विरोधात आज सोमवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. लक्षवेधी निदर्शने करत विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवस्थे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली

या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनीही पाठिंबा दर्शविला.
आंदोलनातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू असून यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

कालपासून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थिनी प्रांजली दुर्गे यांनी सांगितले की, पेपरफुटी मुळे विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागत असून काहींना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. शिक्षण व्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. आमचे आई-वडील कष्ट करून आम्हाला शिकवत आहेत, मात्र पेपर फुटी मुळे आमच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे.

विद्यार्थिनी नूतन गजभिये यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ आजच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी आहे.

काँग्रेसचे विनोद दत्तात्रय यांनी सरकारवर टीका करत, पेपरफुटी रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे तरुणाईला रस्त्यावर उतरावे लागत असून सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असे म्हटले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमन आंदेवार यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सहभागी झालो असून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *