महिला सुरक्षेसाठी चंद्रपूर पोलिसांचे मोठे पाऊल; दामिनी पथकाला ‘पिंक वाहन’ सुपूर्द

चंद्रपूर : जिल्ह्यातील महिला, तरुणी आणि बालकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दामिनी पथकासाठी विशेष ‘पिंक वाहन’ सेवेत दाखल केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला.
महिलांवरील अत्याचार, छेडछाड व अन्य गुन्ह्यांना आळा घालणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या वाहनामुळे दामिनी पथकाची कार्यक्षमता आणि गतिशीलता अधिक वाढणार असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
दामिनी पथकाचे हे पिंक वाहन संकटग्रस्त महिला किंवा तरुणींकडून मदतीचा संदेश मिळताच घटनास्थळी तात्काळ पोहोचून आवश्यक मदत करणार आहे. तसेच चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठा आणि निर्जन भागांमध्ये नियमित गस्त घालून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
विशेष गुलाबी-जांभळ्या रंगातील या वाहनावर ‘दामिनी मोबाईल’ असा लोगो देण्यात आला असून त्यामुळे हे वाहन सहज ओळखता येईल. गर्दीच्या ठिकाणी या वाहनाच्या उपस्थितीमुळे टवाळखोर व समाजकंटकांवरही वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या वाहनात प्रशिक्षित महिला पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे पीडित महिला व मुलींना आपली तक्रार निर्भयपणे आणि मोकळेपणाने मांडता येणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी महिला व मुलींच्या सुरक्षेला चंद्रपूर पोलीस दलाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. दामिनी पथकाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या या नवीन पिंक वाहनामुळे आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद प्रतिसाद देता येईल. कोणत्याही प्रकारची छेडछाड, त्रास किंवा अन्य अडचण उद्भवल्यास महिलांनी न घाबरता पोलीस हेल्पलाइन किंवा दामिनी पथकाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.




