
कॉंग्रेस बालेकिल्ल्यात शेतकरी संघटनेचा उमेदवार विजयी
चंद्रपूर. – राजुरा तालुक्यातील सुबई या गावातील एका जागेसाठी झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शेतकरी संघटनेचे उमेदवार बापूजी मडावी हे आश्चर्यकारक रित्या बहुमताने निवडून आले आहेत. विशेष म्हणजे सुबई हे गाव आणि निवडणूक झालेला वॉर्ड हा कॉंग्रेस चा गेल्या साठ वर्षापासुन बालेकिल्ला असून या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या सुबई सरपंच सुरेखा आत्राम यांचे पती सुधाकर आत्राम यांचा पराभव झाला आहे. शेतकरी संघटनेचे विजयी उमेदवार बापूजी मडावी यांना 114 मते आणि कॉंग्रेस चे पराभूत उमेदवार यांना 82 मते मिळाली. कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याने आपला पराभव होणारच आहे, असे समजून रोजगार बुडवून शेतकरी संघटनेचे उमेदवार बापूजी मडावी हे मत मोजणीला आलेच नाहीत. मात्र अनपेक्षित पणे त्यांचाच विजय झाला. महिला सरपंच यांचे पती पराभूत झाल्याने गावात या निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सुबई येथील शेतकरी संघटनेचे सुधाकर अंगलवार, पुरुषोत्तम अंगलवार, बाबाजी रोहणे, महेश तन्नीरवार, संजय सबावत, संजय लाखमापुरे, शंकर सत्रे, टिपेश्वर लखमापुरे, रामदास मडावी, बाळकृष्ण रडके, व्यंकटेश कलेगुरवार, किरण सत्रे, बाळू घुगलोत, पायल मडावी, तारा आईलवार या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले असून मतदारांचे आभार मानले आहे.