
अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस ; राजेश बेले यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन
नविन चंद्रपूर परिसरातील ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपयांच्या मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी या म्हाडा अंतर्गत कामात निकृष्ठ दर्जाची सामग्री वापरण्यात येत असल्यामुळे बांधकामात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहे. निकृष्ट कामावर पांघरुन घालण्यासाठी कंत्राटदाराने भेगा असलेल्या बांधकामाला रंग लावून लिपापोती केली आहे. कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याने म्हाडाचे अधिकारी निकृष्ट कामाची पाठराखण करीत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले ६ जुनपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ आज मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी विकास गवई, दिपक गुरनूले, अशोक पोहेकर, हरेकृष्ण ठाकूर यांनी मुंडण केले. आंदोलनात राजेश बेले, सरिता मालू,सोनल धोपटे, शाहिद शेख, प्रविण चवरे, संदिप तोडसाम उपस्थित होते.
सदर निकृष्ट कामाबाबत संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेद्वारे २२ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार करण्यात आली. लेखी तक्रारीच्या अनुषंगाने म्हाडाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांनी दि. २२/४/२०२२ रोजी मौका पाहणी केली व ९ मे २०२२ ला पाहणी अहवाल सादर केला. सदर पाहणी अहवाल दिशाभुल करणारा असून भ्रष्टाचार करणार्या कंत्राटदार कंपनी इगल इन्फ्रा इंडिया लि.ची पाठराखण करणारा असल्याचे दिसून येत आहे. यातून कंत्राटदारांची अधिकार्यासोबत साठगाठ असल्याचे स्पष्ट दिसून येते. कंत्राटदार कंपनी इगल इन्फ्रा इंडिया लि.ने तयार केलेले मेनहोलचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले आहे. यातील २५९४ मेनहोल पैकी १८५० मेनहोलला निकृष्ट कार्यामुळे भेगा पडल्या आहे. तसेच जवळपास ६० ते ७५ किलोमिटर टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामात शासनाच्या अटी शर्ती व नियमावलीचे सर्रास उल्लंघन केल्याचे निदर्शनास येत आहे.मलनिस्सारण वाहीनी एसटीपीच्या फिल्टर प्लांटच्या बांधकामात आरसीसी व गिट्टी,रेती,सिमेंटचा वापर योग्य प्रमाणात न केल्याने बांधकामाला मोठ्या प्रमाणात जागोजागी भेगा पडल्या आहे. या भेगा दिसू नये यासाठी कंत्राटदाराने त्यावर रंग मारुन भेगा लपविण्याचा प्रयत्न केला आहे. सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रस्टाचार होत असून यात शासकीय अधिकारीही सामील असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून कुठलीही कारवाई न करता भ्रस्टाचाराला मुकसंमती देण्यात येत असल्याने नाईलाजाने अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी कामात भ्रस्टाचारामध्ये साठगाठ करणार्या कार्यकारी अभियंत्यांची उच्चस्तरीय चौकशी करुन तात्काळ निलंबनाची कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल करावा,मलनिस्सारण गटार पाईप लाईन एसटीपीच्या कामात निकृष्ट दर्जाची सामुग्री वापरल्याबद्दल ईगल इन्फ्रा इंडीया लि. कंपनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, संपूर्ण मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी बांधकामाची तिसर्या पक्ष थर्ड पार्टी कडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आदी मागण्यासाठी ६ जुन पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.आज प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन करण्यात आले.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत अन्नत्याग जनआंदोलनाच्या सुरु राहील असा इशारा बेले यांनी प्रशासनाला दिला आहे.




