
चंद्रपूर : टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पाकिस्तानविरुद्ध इंग्लड संघात झाला. या सामन्यावर चंद्रपुरात सट्टा लावला जात असल्याची गोपनीय स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रोशन काळबांधे या युवकाला अटक केली. दरम्यान, त्याच्या अटकेनंतर मुख्य सट्टाकिंग प्रदीप गंगमवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली असून, उशिरापर्यंत प्रदीप गंगमवारला अटक करण्यात आली नव्हती. क्रिकेट मॅचवर चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जातो. रविवारी तुकूम परिसरातील बियाणी पेट्रोलपंपासमोर एक युवक क्रिकेट सट्ट्याच्या नावाखाली काही जणांकडून पैसे घेत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून रोशन काळबांधे रा. बियाणी पेट्रोलपंपजवळ तुकूम चंद्रपूर याला पंचासमक्ष ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळून सट्ट्याच्या नोंदी असलेले कागद, सट्ट्यासाठी नागरिकांकडून स्वीकारलेले रोख पाच हजार १२० रुपये आणि पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याची अधिक चौकशी करीत मुख्य सूत्रधाराची माहिती काढली असता सट्टाकिंग प्रदीप गंगमवार याचे नाव सांगितले. त्यामुळे दोघांवरही रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु, उशिरापर्यंत प्र्रदीप गंगमवार याला अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास रामनगर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.




