
चंद्रपूर : वेकोली वणीक्षेत्रचा भालार टाऊन शिपकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील सुंदर नगर येथील नितीन उकनकर हे भालार मार्गावरून वणीच्या दिशेने जात असताना अचानक एक मोठा वाघ कारसमोरून गेल्याने कारमधील सर्वजण थक्क झाले. हे चित्तथरारक दृश्य त्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. वेकोलिच्या निलजई, उकणी, पिंपळगाव येथील खाणीतून बाहेर पडणारी माती टाकल्यानंतर त्या ढिगाऱ्यांवर अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली होती. त्याचे रूपांतर आता घनदाट जंगलात आणि डोंगरात झाले आहे. आज येथे अनेक पक्षी आणि वन्यप्राण्याचा अधिवास आहे. त्यात मोर, हरीण, नीलगाय, रानडुकर आणि आता वाघांनी येथे आसरा घेतला आहे.
वेकोलिच्या खाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन पिल्लांसह वाघीणीचे दर्शन झाले होते. त्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या परिसरातील खदानक्षेत्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाघ व वन्यप्राणी दिसून येत आहेत.




