राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था;
बामणी–राजुरा मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनचालक हैराण

राजुरा – बामणी–राजुरा–लक्कडकोट राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असले तरी पर्यायी वळण रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वर्धा नदीवरील पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यावर पावसाचे पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मागील वर्षभरापासून या महामार्गाचे काम सुरू आहे. पुलाच्या परिसरात वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी तात्पुरते वळण रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र हे रस्ते कच्चे असल्याने अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये चिखल साचल्याने वाहने घसरत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी, प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बाक्स – वळण रस्त्यांकडे कंपनीचे दुर्लक्ष महामार्गाच्या कामादरम्यान पर्यायी रस्ते सुरक्षित व मजबूत ठेवणे ही बांधकाम कंपनीची जबाबदारी असते. मात्र या प्रकल्पात वळण रस्त्यांच्या देखभालीकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीही अशाच परिस्थितीमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले होते. तरीही यंदा आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.



