
कोरपना – कोरपना येथे एकही राष्ट्रीयकृत बँक नाही. त्यामुळे बँक खातेदाराची मोठी गैरसोय होत आहे. करिता येथे नवीन राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे. कोरपना हे तालुक्याचे ठिकाण आहे. या स्थानी अनेक शासकीय निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था , मोठी बाजारपेठ आहे. तसेच हे शहर तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. त्यामुळे येथील आर्थिक रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे. परंतु येथे राष्ट्रीयकृत बँक नसल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी, कर्मचारी, शेतकरी व विद्यार्थी यांना इतरत्र ठिकानी असलेल्या शाखेत जाऊन आपले व्यवहार करावे लागत आहे. तालुक्यात चार स्टेट बँक , दोन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा आहे. मात्र त्या गडचांदूर , अल्ट्राटेक सिमेंट , कवठाळा, वनसडी, लखमापूर , अंबुजा फाटा या स्थळी आहे. त्यामुळे तेथील भागातील नागरिकांना व्यवहारासाठी सोयीचे आहे. परंतु कोरपना , पारडी , कोडशी, मांडवा भागात एकही राष्ट्रीयकृत बँक नसल्याने परिसरातील सत्तर गावासह सीमेलगतच्या गावांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरपना येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू केल्यास ही अडचण दूर होईल. तसेच परिसरातील नागरिकांना बँकेच्या व्यवहारासाठी सोयीस्कर ठरेल. या अनुषंगाने अनेकदा विविध बँक प्रशासनांना निवेदन देण्यात आली. पण अजूनही या आर्थिक दृष्ट्या महत्वपूर्ण व्यवहार असलेल्या स्थानी एकाही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू झाली नाही. परिणामी नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे.
एकही बँकेची सी डी एम मशीन नाही.
कोरपना येथे बँक ऑफ इंडिया , सी डी सी सी , सन्मित्र या बँकेचे एटीएम आहे. मात्र एकाही बँकेची सीडीएम मशीन नाही. त्यामुळे नागरिकांना कॅश टाकायचे असल्यास बँकेत जाण्याशिवाय पर्याय नाही. बँक ऑफ इंडिया वनसडी शाखेतच सीडीएम मशीन लावण्यात आली आहे. आणि बँकेत तेथेच आहे. त्यामुळे तेथील सीडीएम मशीन कोरपना येथील ए टी एम असलेल्या ठिकाणी बाजूला लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


