नवी दिल्ली (मवृसे) विविध राज्यांनी अगोदरच लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता केंद्र सरकारही लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. कदाचित यावेळी लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणाही केली जाऊ शकते. राज्यांनी लॉकडाऊन वाढवले असले तरी काही राज्य अजूनही केंद्राच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. रेल्वे, विमान अशा विविध सेवा केंद्राच्या अखत्यारित असल्यामुळे मोदींच्या संबोधनाकडेदेशाचे लक्ष लागले आहे.
ओदिशा, पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांनी लॉकडाऊन वाढवणार असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे. केंद्र सरकारही सध्या सुरू असलेले २१ दिवसांचं लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवण्याची शक्यता आहे. पण राज्यांचे लॉकडाऊन असतानाही केंद्राच्या लॉकडाऊनची काय गरज? असाही प्रश्न निर्माण होतो. घटनेनुसार, कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य हे विषय राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे राज्य सरकार या दोन विषयांवरच निर्णय घेऊ शकते. याशिवाय साथीचे रोग कायदा १८९७ या अंतर्गतही राज्याला बरेच अधिकार आहेत. या अंतर्गतच राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.



