मुंबई (मवृसे)करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही भारतात करोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की १४ एप्रिलला संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे. पंतप्रधानांनी १४ तारखेनंतर लगेचच पूर्णपणे लॉकडाउन हटवणार नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. पिनाकी मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलनंतर एकाच वेळी पूर्णपणे लॉकडाउन हटवला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसंच करोनाच्या आधीचे आणि नंतरचे आयुष्य सारखे नसणार आहे असंही मोदींनी म्हटले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.करोनाच्या पाश्र्वभुमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नरेंद्र मोदींनी आज लोकसभा आणि राज्यसभेत पाचपेक्षा जास्त सदस्य असणाèया संसदेतील नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदींनी सर्वांना करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे यासंबंधी माहिती दिली.


