
देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा नववा दिवस आहे. संपूर्ण देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली. गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२८ नवे रुग्ण आढळले असून २९ राज्यांमध्ये एकूण रुग्णांची संख्या १९६५ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ५० रुग्णांचा मृत्यू झाला. यातील गेल्या २४ तासांमध्ये करोनाच्या एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे १५१ लोक बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. दिल्लीतील निझामुद्दीन येथे मरकझला गेलेल्या ९ हजारलोकांची ओळख पटली आहे. या ९००० पैंकी १३०६ लोक परदेशी नागरिक आणि उरलेले इतर भारतीय आहेत. यातील जवळपास ४०० जण करोना संक्रमित असल्याचे समोर आले.
तबलीघी जमातशी निगडीत १८०४ जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय, अशीही माहितीकेंद्रीय मंत्रालयाने दिली. मुंबईतील धारावी भागात एकाचा मृत्यू झाल्यानंतर या भागातील ३०० घरे सील करण्यात आली आहेत, अशी माहितीही यावेळी लव अग्रवाल यांनी दिली. करोनाविरुद्ध लढा अजूनही सुरूच आहे. यामध्ये सर्वांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. सर्व धर्माच्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे गरजेचे आहे. राज्य सरकारनेही लॉकडाऊनचे पालन सक्तीने करण्याची गरज आहे, असेही आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले.



