
नवी दिल्ली (मवृसे) देशात करोनाचा सामूहिक संसर्ग अद्याप झालेला नाही. यामुळे कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही. पण प्रत्येकाने सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. करोनाचा संसर्ग हा स्थानिक आहे की सामूहिक यापेक्षाही महत्त्वाचे आहे ते अधिक संसर्ग असलेले भाग सील करून पूर्ण दक्षता घेण्याची, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ६४१२ इतकी झाली असून १९९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आपण काल एकूण १६००२ करोना चाचण्या केल्या. त्यापैकी फक्त २ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
नमुन्यांची एकूण संख्या पाहता करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. आपण रॅपिड टेस्टची परवानी दिली असून रॅपिड टेस्ट किटची ऑर्डर ही दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. करोना विरोधील लढाईत वैद्यकीय सेवेतील डॉक्टर, कर्मचारी आणि पथके हे आपले आघाडीचे शिलेदार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याशी गैरवर्तन किंवा त्यांच्यावरील हल्ल्यांमुळे समाजाचं आणि देशाचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच यामुळे त्यांचे मनोबल खचेल. देशाला १ कोटी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची गरज आहे.



