![]()
चंद्रपूर येथील “निमा फोरम वुमन्स फोरम” व “संकल्प” चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. “आज इतर व्यसनासोबतच मोबाईलचे वेड सर्वांना लागले आहे. मोबाईल व त्यांच्या स्क्रीन चे होणारे फायदे व नुकसान.” याविषयावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. स्मिता जीवतोडे यांनी सर्वांना संबोधित केले. “महिलांनी सर्वांगीण दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे.शारीरिक व मानसिक आरोग्य उत्कृष्ट कसे ठेवायचे?” याबाबत कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. नसरीन मावानी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून उपस्थित महिलांसोबत चर्चा करतांना दैनिक महाविदर्भ वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका सौ. कल्पना पलिकुंडावार यांनी सांगितले की, “कुठलेही नवीन काम सुरू करताना अनेक अडचणी येतात कदाचित अनुभव एवढे भयंकर असतात की काम ठेवून परतून जावसं वाटतं. परंतु मनाची जिद्द आणि ध्येय गाठण्याचे स्वप्न उराशी असले की ध्येयपूर्ती ही होतेच म्हणून मनामध्ये जिद्द ठेवून हाती घेतलेले काम धाडसाने पूर्ण करण्याचे स्वप्न सर्वांनी बघावे. त्यांनी स्वतः च्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगून मुलींना प्रेरित करतांना सांगितले की तुमच्या इच्छाशक्तीवर तुमचे यश अवलंबून असते.” जागतिक महिलादिनाच्या या कार्यक्रमात महिलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घ्यावा त्यांचा आत्मविश्वास वाढावा, याकरिता विविध प्रकारच्या छोट्या छोट्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. त्यामध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. बंगाली चौक ते इंदिरानगर चौक मुख्य रस्त्यावरील झाडू मारणाऱ्या सफाई कर्मचारी शुभांगी संजय पेंदाम यांना सन्मानित करण्यात आले. “महिला दिन साजरा करताना फक्त शुभेच्छा देऊन कार्यक्रम करण्याऐवजी महिलांनी संघटित होऊन समाजापुढे एक आदर्शवाद निर्माण करावा. विविध सामाजिक हिताचे उपक्रम राबवावेत. आजची महिला कुठेच कमी नाही, महिलांनो संघटित व्हा आणि चला आकाशी झेप घेऊया.” असे ‘संकल्प’ चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निमा वुमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. सिमला गाजर्लावार यांनी या कार्यक्रमात बोलताना “स्त्री हे त्यागाचे स्वरूप आहे. प्रत्येकच वेळी स्त्रीला काही ना काही कारणास्तव त्याग करावा लागतो. म्हणूनच महिलांनी आत्मनिर्भर होऊन आत्मसंरक्षण करावे, व याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन या जगात लढा देण्यास स्वतः तयार व्हावे. महिलांनी आयुष्यात उंच भरारी घ्यावी” अशी शब्दरूपी शुभेच्छा त्यांनी दिल्या. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “संकल्प” चे व्यवस्थापक कुंदन सतीश खोब्रागडे व निमाच्या सदस्या डॉ. वैशाली बदनोरे यांनी केले. निमाच्या सेक्रेटरी डॉ. रुपाली उत्तरवार यांनी सर्वांचे शब्दसुमनाने आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निमाच्या सदस्या डॉ. मनीषा घुगल, डॉ. दिपाली चींतावार, डॉ. माधुरी धानोरकर, डॉ. पूर्वी आहुजा, डॉ. स्मिता भांडेकर, डॉ. साक्षी खाडिलकर,डॉ. प्रणाली डांगेवार, डॉ. सुषमा लोधे, डॉ. प्रांजली आर्या व संकल्प च्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



