कोरोना योद्ध्यांची भूमिका महत्त्वपूर्ण
महानगरपालिकेत कोरोना विषयक आढावा बैठक चंद्रपूर, दि. 6 जुलै: कोरोनाचा प्रसार होत असताना महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी आहे. ही बाब समाधानकारक असली तरी शहरात अलगीकरण प्रक्रिया आणखी सक्षम करा. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची योग्य नोंद ठेवा. चंद्रपूर शहर तसेच जिल्हा कोरोना मुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिल्यात. महानगरपालिका चंद्रपूर येथे ना. प्राजक्त तनपुरे यांनी महानगरपालिकेतील विविध विषय व कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. ते आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे, सहायक आयुक्त सचिन पाटील, धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती राजुरवार, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ महावितरणचे सुनील देशपांडे, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिका अंतर्गत चंद्रपूर शहरातील कोरोना बाबतचा आढावा आयुक्त राजेश मोहिते यांनी सादर केला. बाहेरून शहरामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य आहे. तसेच विना परवानगीने बाहेरून आलेल्या नागरिकांवर कारवाई सुद्धा केलेली आहे. या विषयीची माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी यावेळी दिली.
दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यासाठी महानगरपालिकेने तसे नियोजन करावे. त्याचप्रमाणे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण, गृह अलगीकरण करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योध्दयांची भुमिका महत्वपूर्ण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.



