तालुक्यात खरीपाचा हंगाम सुरू असून धानाची पेरणी आटोपल्या जात आहे. शेतात प—हाटी आणि तूर लावण्यासाठी बोंडाळा खुर्द येथील विलास नागापूरे आणि नामदेव पोरटे हे आपआपल्या पत्नीसह सकाळी शेतात गेले होते.दोघांचे शेत लागूनच असल्याने शेतीकाम सुरूच होते. गुरूवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान वातावरणात बदल झाला आणि वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली.पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतातील कडूलिंबाच्या झाडाखाली या चौघांनी आश्रय घेतला.त्याच वेळेस कडाडलेली वीज कडूलिंबाच्या झाडावर कोसळली.त्यात भाजल्या गेल्याने विलास केशव नागापूरे आणि गयाबाई नामदेव पोरटे यांचा जागीच मृत्यू झाला.तर ताराबाई विलास नागापूरे आणि नामदेव तानू पोरटे हे गंभीर जखमी झाले.त्यांच्या सोबत असलेली दोन बकरे सुदधा वीजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडली.हे दोन्ही बकरे विलास नागापूरे यांची होती. बोंडाळा खुर्द येथील या दुर्दैवी घटने मुळे गावात हळहळ आणि शोक व्यक्त् केल्या जात आहे. घटनेची माहीती मिळताच बेंबाळ पोलिस चोकीचे पोलिस उपनिरिक्षक प्रशांत ठवरे,मूल येथील नायब तहसिलदार यशवंत पवार आणि बोडाळा खुर्दचे सरपंच जालिंद्र बांगरे यांनी भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा केला. यात गंभीर जखमी वर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतकांवर उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.





