
राज्यामध्ये राजकीय समीकरण बदल झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. स्वातंत्र्य दिनाच्या आधी 20 जणाचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. आता विसर्जनापूर्वी पालकमंत्र्यांची घोषणा होईल आणि दिवाळीच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती राज्याचे वन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर येथील शासकीय विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यामध्ये सध्या विद्यमान मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल होईल, अशी चर्चा आहे. मात्र त्यात कोणताही बदल होणार नसून, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चिंता करू नका दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या आधी महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी आणखी मंत्र्यांमध्ये वाढ होईल, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.



