
मुंबई (मवृसे)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशभरात नागरिकांनी आपल्या घरातले लाईट घालवत, दिवे पेटवून करोनाविरुद्ध लढ्यात आपला सहभाग नोंदवला. मात्र देशातील काही भागांमध्ये लोकांनी यावेळेलाही नियमांचा भंग केलाच. काही लोक हातात मशाली घेऊन रस्त्यावर उतरले होते, तर काही ठिकाणी लोकांनी फटाके फोडले. सोलापूर, दिल्ली यासारख्या शहरांमध्ये आग लागण्याच्याही घटना घडल्या. सोशल मीडियावर या घटनांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने नियम मोडत रस्त्यांवर येणाèया लोकांना चांगलाच टोला लगावला आहे.
रस्त्यावर येऊन जल्लोष करु नका, घरातच थांबा. विश्वचषकाला अजुन वेळ आहेःअशा खोचक शब्दांमध्ये रोहितने ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटे हवी आहेत, असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले होते. राजकीय नेत्यांनीही मोदींच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. रोहित शर्मानेही आपली जबाबदारी ओळखत पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधी आणि पाळीव प्राण्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी मिळवून ८० लाखांचा निधी दान केला आहे.



