चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

राज्यात पावसाची पुन्हा एकदा दमदार हजेरी-जिल्ह्यातही मागील दोन दिवसांपासून संततधार सुरू

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असुन चंद्रपूर जिल्ह्यातही मागील दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. यावर्षी वरुणराजा जास्तच मेहेरबान झाल्याचे चित्र असुन जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यात अडथळा निर्माण होत आहे. कित्येक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या झाडांची वाढ व्यवस्थित झालेली नाही मात्र शासकीय नियमाप्रमाणे 65 मिमी पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना कुठलीही नुकसानभरपाई किंवा आर्थिक मदत मिळालेली नाही. जिल्ह्यात कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार, तीबार पेरणी सुद्धा करावी लागली आणि आता परत पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. धान उत्पादक शेतकरी बऱ्या प्रमाणात सुखावत असला तरीही इतर शेतकरी मात्र मशागती साठी होणाऱ्या खर्चामुळे बेजार झाला असुन पिकात वाढणारे तृण काढण्यासाठी निंदणाचा खर्च वाढत आहे. दुसरीकडे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा नदी नाले फुगत असुन नदी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचे काळे सावट दाटू लागले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाने जोरदार धडक दिल्याने वर्धा नदीला तब्बल तीन वेळा पूर आला होता. ह्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना जबर फटका बसला. पेरलेली बियाणे उगवलीच नाही तर उगवलेले पीक पाण्याने सडून गेले त्यामुळे पुन्हा पुन्हा पेरणी करावी लागली. मागील महिन्यात पावसाने उघाड दिल्याने शेतीची कामे मार्गी लागली मात्र आता पुन्हा एकदा जोरदार पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा नदीला पुर आला असून औद्योगिक नगरी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या गडचांदुरला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा धानोरा मार्ग पुरामुळे बंद झाला आहे. पुरामुळे धानोरा गावाचा संपर्क तुटला असुन परिसरातील शेतात पाणीच पाणी साचले आहे. ह्या हंगामात वर्धा नदीला चौथ्यांदा पूर आला असुन ह्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *