
चंद्रपूर : जिल्ह्यात आज दूपारपासून विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसादरम्यान तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून 3 जण ठार तर 2 महिला जखमी झाल्याची घटना आज रविवारी घडली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी आहे. पहिली घटना ब्रह्मपुरी तालुक्यात आवळगाव शेतशिवारात घडली. यामध्ये 1 महिला ठार झाली तर 1 महिला गंभीर जखमी झाली. दुसरी घटना सावली तालुक्यात घडली असून चकपिरंजी शेत शिवारात एका महिलेचा मृत्यू झाला तर गेवरा खुर्द शिवारात एक शेतकरी ठार झाला. या घटनेमध्ये एक महिला जखमी झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे धान पीक निंदणाचे काम सुरू आहे. आज रविवारी आवळगाव येथील नथुजी नरुले यांच्या शेतावर शामला लोळे व ज्योती पोहनकर यासह पाच-सात महिला निंदणाकरीता गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला जोरदार सुरुवात झाली. दुपारी दोन वाजताच्या निदंनानंतर शेतातील बांधावरील झाडाखाली महिला जेवण करायला बसल्या होत्या. विजांचा कडकडाट होवून विज कोसळल्याने श्यामला लोळे (वय 50) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर ज्योती पोहनकर ( वय 24) ही महिला गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेला आरमोरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले आहे. दूसरी घटना सावली तालुक्यातील चकपिरंजी शिवारात सायंकाळी घडली. येथीलच मंगला सुधाकर येल्लटीवार (वय 55) ही महिला स्वतःच्या शेतात निंदणाचे काम करीत असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामध्ये या महिलेच्या अंगावर वीज पडून ती शेतात जागीच ठार झाली. शेतातून पत्नी अजून घरी परत येण्यास विलंब झाल्याने पती सुधाकर हा शेतात पाहण्यासाठी गेला असता ती शेतात पडून दिसली . सावली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच; घटनास्थळी येवून पंचनामा केला. तिसरी घटनाही याच तालुक्यातील गेवरा खुर्द शेत शिवारात घडली. आज दुपारपासून जोरदार पाऊस सूरूवात झाला. शेतकरी शरद पंढरी मुनघाटे (वय 50) हे शेतात निंदणाचे काम करीत असताना दुपारी 3 च्या सुमारास जोरदार विजेचा कडकडाट झाला. आणि त्यावेळी शेतक-यावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करण्याऱ्या 5 ते 6 महिले पैकी एक महिला ही जखमी झाली. मृतकाचे पश्चात 3 मुली असुन घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.



