यवतमाळ (मवृसे) यवतमाळमध्ये एकाच भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने तसेच आज १५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह मिळाल्याने यवतमाळ शहर तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी दिले आहेत. रुग्णालये, औषधी दुकाने आणि दुधाची दुकाने वगळता किराणा आणि भाजीपाल्याची दुकानेही बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी तीन दिवस विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन देवेंद्रसिंह यांनी केले आहे. शुक्रवारी १२७ संशयितांचे नमुने तपासणीकरिता नागपूरला पाठविण्यात आले. तर आज सकाळी जवळपास १५० लोकांचे नमुने पाठविण्यात आले आहेत.
सध्या यवतमाळमध्ये संस्थात्मक विलगीकरणात १३४ तर गृहविलगीकरणात एकूण ७९५ जण आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत तपासणीकरिता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या ८६२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ७११ जणांचे निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी नव्याने आठ पॉझेटिव्ह रुग्ण आढळले होते. या सर्व पाश्र्वभूमीवर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दिवस यवतमाळ बंद राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता कोणतीही दुकाने शहरात सुरू राहणार नाहीत. तसेच या तीन दिवसांत पेटड्ढोलपंप केवळ सकाळी ६ ते दुपारी १२ वाजतापर्यंत सुरू राहणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.



