
मार्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर नागरिकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलाविली. परंतु, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास घटली. रस्त्याने फिरताना अचानक वाघाचे दर्शन झाल्याने हृदयविकाराचा धक्का बसला असावा, अशी चर्चा आहे. प्रवीण मराठे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
येथील वॉर्ड क्रमांक १२ मधील प्रवीण मराठे हे आज सकाळी मार्निंग वॉकसाठी चारचाकी वाहनाने गेले. शिवटेकडी परिसरात त्यांनी आपले चारचाकी वाहन ठेवले. त्यानंतर चंद्रपूर मार्गाने ते पायदळ फिरू लागले. काही अंतर पूर्ण केल्यानंतर ते परत येत होते. रस्त्यात अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला कोसळले. ही बाब याच रस्त्याने मार्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलाविली. परंतु, यावेळी एक ते दीड तासानंतर रुग्णवाहिका पोहोचेल, असे सांगण्यात आले. मूलचे पोलिस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तोपर्यंत मराठे यांचा जिव गेला होता.
आज सकाळच्या सुमारास वाघ रस्ता ओलांडत असल्याचे काही नागरिकांनी बघितले. मार्निंग वॉक करीत अचानक वाघाचे दर्शन झाले. यातून मराठे यांना हृदयविकाराचा धक्का बसला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती आणि वेळेवर उपचार झाला असता, तर मराठे यांची जिव वाचविता आला असता, अशी चर्चा आहे. पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता मूल उपजिल्हा रुग्णालायत पाठविला




