
– पद्मश्री डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना जीवनगौरव, अर्चना मानलवार यांना सेवार्थ सन्मान प्रदान
चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्या सेवेचे संस्कार आमच्यावर झाले. आपले जीवन समाजासाठी आहे, या जाणीवेने गडचिरोलीतील अतिदुर्गम हेमलकसा येथे वैद्यकीय सेवेला आम्ही दापत्यांनी वाहून घेतले. आम्ही करत असलेल्या कामाचा प्रभाव आमच्या मुलांवर झाला. आज आमची तिसरी पिढी समाजसेवेत कार्यरत आहे. निष्ठेने सेवा करणारी समाजातील नवी पिढी पुढे आली पाहीजे, असे प्रतिपादन रॅमन मॅगेसेसे, महाराष्ट्रभुषण, पद्मश्री सन्मानित थोर समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी केले. समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुप बिबी आयोजित दिव्यग्राम २०२२ महोत्सवात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते, माजी आमदार ॲड.वामनराव चटप, स्वागताध्यक्ष स्नेहल उपरे, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अनिल मुसळे, समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, सविता काळे, माजी सरपंच संतोषकुमार पावडे, राहुल आसुटकर, शंकर आस्वले, प्राचार्य काळे, मुकुंदा गुलबे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी राज्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार पद्मश्री डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना तसेच आश्वासक युवा सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात येणारा नामांकित सेवार्थ सन्मान चंद्रपूर येथील ज्ञानार्चना संस्थेच्या माध्यमातून अपंग कल्याणार्थ कार्यरत करणा-या अर्चना मानलवार-भोयर यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप होते. मागील ११ वर्षांपासून बिबी येथे दिवाळी उत्सव फटाकेमुक्त, ग्रामस्वच्छतेने व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरा करण्यात येते. कार्यक्रमात पद्मश्री डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकट मुलाखत पार पडली. साहित्यिक, पत्रकार व नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य रत्नाकर चटप यांनी मुलाखतीतून आमटे दांपत्यांना बोलते केले. अर्चना मानलवार भोयर यांनीही मनोगतातून आपल्या संघर्षमय कार्याचा इतिहास उलगडला. कार्यक्रमाचे संचालन अविनाश पोईनकर, प्रास्ताविक स्नेहल उपरे तर आभार हबीब शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत तुम्हाणे, विठ्ठल अहिरकर, संदिप पिंगे, संतोष बावणे, अनिल हिंगाणे, प्रमोद विरूटकर, राकेश बोबडे, सुरेंद्र मुसळे, राजू खनके यासह युवक मित्रमंडळींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अनिकेत आमटे, लेखक आशीष देव, प्रा.जहीर यासह जिल्हा व परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कर्मयोगींच्या सेवेचा आदर्श समाजाने घ्यावा
– ॲड.वामनराव चटप
डॉ.मंदाकिनी व प्रकाश आमटे यांच्या लोकसेवेने जगभरात आपल्या देशाचे नाव मोठे केले. अर्चना मानलवार-भोयर या स्वत: अपंग असतांनाही अपंग कल्याणासाठी काम करतात. माणसाच्या हाता-पायाची मोडलेली, लचकलेली हाडे ३७ वर्षापासून निशुल्क जुळवून बरे करणे सोपी गोष्ट नाही. एकही रुपया न घेता चार लाखाहून अधिक लोकांना समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांनी बरे केले. ही कर्मयोगी माणसं आहेत. माणूस कर्माने मोठा होतो. कर्मयोगींच्या सेवेचा आदर्श समाजाने घ्यावा, असे मत यावेळी शेतकरी नेते व माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी व्यक्त केले.