मुंबई (मवृसे) पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करूनये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे, असेही मुख्यमंत्रीम्हणाले. या घटनेवर अधिक भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की १६ तारखेस कासा पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी हा घृणास्पद प्रकार घडला तेथून अवघे काही मीटर अंतरावर दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाची सीमा सुरु होते.



