
चंद्रपूर : २९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत निर्मिती केंद्राचा वीज उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा नावलौकिक आहे. नैसर्गिक संसाधनांचे (पाणी, कोळसा आणि तेल) संरक्षण आणि इष्टतम वापर करण्यात येतो.महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे. “एनव्हायरो एक्सलन्स कौन्सिल” (CEE) ही एक स्वायत्त, राष्ट्रीय-स्तरीय संस्था असून ऊर्जा क्षेत्राशी संबंधित संशोधन आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करते. दरवर्षी “सीईई नॅशनल पॉवर प्लांट अवॉर्ड्स” घोषित करते. पॉवर प्लांट संबंधित पर्यावरणीय कामगिरी, पाण्याचा वापर, भारांक, दुय्यम तेलाचा वापर, सहाय्यक वीज वापर आणि युनिट नेट उष्णता दर यासह अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये त्यांची कामगिरी मोजण्यासाठी हा पुरस्कार विशिष्ट बेंचमार्क स्थापित करतो. कौन्सिल ऑफ एन्व्हायरो एक्सलन्स (CEE) ने १३ आणि १४ मार्च २०२३ रोजी थर्मल पॉवर प्लांट्समधील “ऑपरेशन, मेंटेनन्स, रिनोव्हेशन अँड मॉडर्नायझेशन कॉन्फरन्स २०२३ ” अंतर्गत ” नॅशनल पॉवर प्लांट अवॉर्ड २०२३ ” चे आयोजन केले होते. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र संच क्र. ८ व ९ आयपीपी – २५० ते ५०० मेगावॅट श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कार्यप्रदर्शन संच म्हणून २०२३ सालच्या राष्ट्रीय पॉवर प्लांट या प्रतिष्ठित पुरस्काराच्या ऑपरेशनल एक्सलन्ससाठी “विजेता” म्हणून घोषित करण्यात आले . सदर व्हर्च्युअल कॉन्फरन्सला पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (सं. व सु.-२) ,श्याम राठोड, उपमुख्य अभियंता, संच क्र. ८ व ९ हे उपस्थित होते. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, संचालक (संचलन) संजय मारुडकर यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले तसेच चंद्रपूर वीज केंद्रात कार्यरत अधिकारी,अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांचे कामाप्रति असलेले समर्पण आणि उत्स्फूर्त सहभागाचा हा परिपाक असल्याचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे यांनी सांगितले.



