
घुग्घुस : घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा येथील वॉर्ड क्रमांक 4 च्या झोपडपट्टी परिसरातील सडवेली आसम यांच्या घराला सिलेंडरच्या गळतीने आग लागली. आगीत घरात असलेले सडवेली आसम, पत्नी अनिता आसम व मुलगा रोहित आसम हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. नंतर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने दोन दिवसांपूर्वी पती सडवेली आसम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नी अनिता आसम यांचा शुक्रवार, 13 मे रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पती पत्नीच्या मृत्यूने नकोडा परिसरात शोककळा पसरली आहे. 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नकोडा येथे झोपडपट्टी परिसरात राहणारे सडवेली आसम यांच्या स्वयंपाक घरात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे त्यांची पत्नी स्वयंपाक बनवत असताना अचानक सिलेंडरने पेट घेतला. त्यामुळे घराला आग लागली व घरातील साहित्य जळून खाक झाले होते. घराला आग लागताच आसम कुटुंबीयांनी आरडाओरड करणे सुरू केले. आगीत पती, पत्नी व मुलगा हे तिघेही गंभीर जखमी झाले. घरातून आगीचा धूर निघू लागल्याने शेजारील नागरिकांनी धाव घेतली व पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी व पोलिसांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली व सिलेंडरला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली होती




