कुणबी समाज मंडळाला अभ्यासिकेसाठी ५० लाखाचा निधी
आमदार किशोर जोरगेवार : कुणबी समाज राज्यस्तरीय ऑनलाइन उपवर-वधू मेळाव्याचा समारोप
चंद्रपूर : कोणत्याही समाजाचा विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहायला नको. समाजातील गरिब, गरजू विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न देता नि:शुल्क अभ्यास करता यावा, याकरिता अभ्यासिकांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कुणबी समाज मंडळाला अभ्यासिकेसाठी आपल्या विकासनिधीतून ५० लाख रुपये देण्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आणि मध्यवर्ती धनोजे कुणबी समाजपुरस्कृत राज्यस्तरीय त्रीदिवसीय ऑनलाइन उपवधू-वर परिचय मेळाव्याचा समारोप रविवारी (ता. २७) कुणबी समाज मंदिर येथे पार पडला. या समारोपीय सत्रात आमदार किशोर जोरगेवार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी उपसभापती अॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, कृउबासचे सभापती दिनेश चोखारे, नगरसेवक देवानंद वाढई, नगरसेविका सुनिता लोढीया, डॉ. अभिलाषा गावतुरे आदींची उपस्थिती होती.
आमदार जोरगेवार पुढे म्हणाले, कुणबी समाज हा सामाजिक उपक्रमात समाज बांधवांचे प्रबोधन करणारा समाज असून, याचा मोठा फायदा समाजातील युवा पिढीला होणार आहे. या समाजाच्या वतीने दरवर्षी आयोजित होत असलेल्या उपवर-वधू परिचय मेळाव्यातून पालकांना कमी वेळ खर्च करुन उत्तम स्थळ शोधणे शक्य होत आहे. सुसंस्कृत समाजासाठीही असे आयोजन काळाची गरज आहे. कुणबी समाजाने आयोजित केलेला शेतकरी मेळावा, परिचय मेळावा कौतुकास्पद आहे.
यावेळी जेईईमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल शुभम डाखरे, सुरज डाखरे, केतन जुनघरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचीही समायोचित भाषणे झालीत. निवडक उपवर-उपवधुंनी परिचय दिला. या ऑनलाइन मेळाव्यासाठी विजय मुसळे यांचे विशेष योगदान लाभले. संचालन प्रा. नामदेव मोरे यांनी, तर आभार विनायक धोटे यांनी मानले.
इच्छुकांसाठी दोन दिवसांची संधी
कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा २०२०-२१ यामध्ये ज्या उमेदवारांना प्रत्यक्षपणे परिचय देता आला नाही. त्या उमेदवारांनी त्यांच्या परिचयाचा व्हिडिओ kunbimarriage@gmail.com या मेलवर पाठवावा. हे व्हिडीओ ऑनलाईन परिचय पुढील दोन ते तीन दिवस पाहता येईल. व्हिडीओ शक्यतो एक ते दोन मिनिटांचा असावा, व्हिडिओमध्ये स्पष्टता असावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.



