
चंद्रपूर (का.प्र.) जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रूग्णसंख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. अशातच योग्य उपचाराअभावी कोरानाग्रस्तांचे मृत्यु होत असल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनातर्फे केवळ घोषणा करण्यात येत आहेत, प्रत्यक्षात घोषणांची अंमलबजावणी मात्र होत नाही. घोषणांचा सुकाळ मात्र अंमलबजावणीबाबत दुष्काळ अशी स्थिती या जिल्हयात निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्वसामान्य नागरिक यात भरडले जात आहे. तीन दिवसाआधी आम्ही जिल्हाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून चंद्रपूरात खनिज विकास निधीतुन कोविड रूग्णांच्या निःशुल्क उपचारासाठी एक हजार बेडचे जंबो हॉस्पीटल उभारावे या मागणीचे निवेदन सादर केले होते. 48 तासाच्या आत याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी सुध्दा आम्ही केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक तिव्र करण्याचा ईशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिला आहे.



