चंद्रपुर

आरोग्य सुविधांवर एक कोटीच्या खर्चाची परवानगी द्या -आ.सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून विशेष बाब म्हणून एक कोटी रूपयाचा निधी खर्च करण्याची परवागनी देण्यात यावी, याबाबत जिल्हाधिकारी यांना सर्वाधिकार प्रदान करावे, अशी मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अप्पर सचिव यांना निवेदन पाठवले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव ही सध्या चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा विविधउपाययोजना केल्या जात आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून या प्रक्रियेत माझेही योगदान असावे, या भावनेतून माझ्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रूपयाचा निधी अन्य आरोग्य विषयक उपाययोजनांसाठी देण्याचा माझा मानस असल्याचे आ. मुनगंटीवार यांना निवेदनात म्हटले आहे. या माध्यमातून शासकीय रूग्णालयांमध्ये अर्थात जिल्हा सामान्य रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा, औषधी, सॅनिटायझर, मास्क आदींसाठी हा निधी खर्च करता येईल. यासाठी विशेष म्हणून मला अनुमती द्यावी आणि जिल्हाधिकारी यांना सर्वाधिकारी प्रदान करावे, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *