चंद्रपूर, दि.5 मे: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्ह्यातील अनेक कामगार तेलंगणामध्ये अडकलेले होते.असे जवळपास 1 हजारावर कामगार तेलंगणातून चंद्रपूरला पोहचले. जिल्हा प्रशासनाने स्वखर्चाने या कामगारांना आपआपल्या स्वगावी सकाळी 9 वाजता त्यांना 25 बसेसतून रवाना केले.
तेलंगणा राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कामगार मिरची तोडण्यासाठी गेले होते. यामध्ये प्रामुख्याने सावली, नागभीड, कोरपना, जिवती, मुल, सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरी, चंद्रपूर, ब्रह्मपुरी या तालुक्यातील 1 हजार 212 कामगार स्वगावी परत आले आहेत. या कामगारांना जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.तेलंगणा मधून आलेले कामगार हे जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी 25 खाजगी बसेसची व्यवस्था केली होती.



