चंद्रपूर, दि. 26 मे : महाराष्ट्र शासनाच्या आपत्तीव्यवस्थापन मंत्रालयाच्या दिमतीला पावसाळ्याच्या सुरुवातीला नव्या 116 बचाव कार्य बोटी उपलब्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.
पावसाळ्यापूर्वी राज्याच्या मान्सून पूर्वतयारीची बैठक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ही बैठक आज झाली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, संबंधित सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आपापल्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत मार्गदर्शन केले.
या बैठकीला सर्व विभागीय आयुक्त, मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच थल सेना, वायू सेना, नौ-सेना आदी सर्व दलाचे महाराष्ट्रातील प्रमुख सहभागी झाले होते.



