
गडचिरोली (प्रति)शहरातील नागरिक अत्त्यावश्यक साहित्य खरेदीसाठी एकाच वेळेला गर्दी करीत असल्याने किराणा, मेडिकल व भाजीपाला खरेदी करतांना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी चौकटी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या संसर्गजन्य रोगामुळे जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कोरोना पासून बचाव करण्याच्या हेतूने भाजीपाला, मेडिकल व किराणा साहित्य खरेदीसाठी चौकटीतच उभे राहून ग्राहकांनी खरेदी केल्यास दुकानात व दुकानाच्या काउंटरवर एकाच वेळी होणारी गर्दी टाळली जाऊ शकते. सर्व देशभरात कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे.
यापासून बचाव करण्यासाठी शासन ,प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे.संचारबंदी सारखे हत्यार शासनाने उपसले आहे.तरी सुद्धा जनता अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक दुकानात एकच गर्दी करतांना दिसत आहेत. जनतेच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.
कोरोनापासून इतरांना बाधा होऊ नये यासाठी दोन व्यक्तीत तीन फूट अंतर ठेवणे गरजेचे असून मास्क,सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने साहित्य खरेदी करताना एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांसाठी प्रशासनाने किंवा दुकान मालकांनी दुकानासमोर चौकटी आखून द्याव्यात, जेणेकरून खरेदी करणे सोपे जाईल. येथिल देशमुख बेकरी समोर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये असे फलक लावून स्वतः दुकानाचे मालक देशमुख हे एकेक ग्राहकांना आत सोडत असल्याचे चित्र दिसले. मात्र इतर दुकाने व मेडिकल, भाजीपाला खरेदी करतांना नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. चौकटीतच एका मागे एक अशा पद्धतीने खरेदी केल्यास ते सुरक्षित व सोपे जाईल असे बोलल्या जात आहे.



