गडचिरोली (प्रति ) : काल 3 जुलै रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या सी- ६०- जवानांनी उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या येलमदंडी जंगलात नक्षलविरोधी शोधमोहिम राबवून नक्षलवाद्यांचा कॅम्प उध्दवस्त करून घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या नक्षल्यांचा डाव उधळून लावला होता. पोलीस जवान व नक्षल्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला होता. या नक्षल्याची ओळख पटली असून तो पेरमिली दलमचा कमांडर सोमा उर्फ शंकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो तेलंगणा राज्यातील मुलगू जिल्हयातील कारापल्ली येथील रहिवाशी आहे.
नक्षली शंकर हा 2008- 09 मध्ये नक्षल दलमध्ये सहभागी झाला होता. तो 2012-.13 पासून गडचिरोली जिल्हयातील पेरमीली दलम मध्ये कमांडर म्हणून कार्यरत होता. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 5 खुन, 5 गुन्हे चकमकीचे, 3 जाळपोळी, दरोडयाचे 1 व इतर 1 गुन्हयांचा समावेश आहे. पोलीस जवानांनी नक्षली कॅम्प उध्दवस्त केल्यानंतर घटनास्थळावरून एक हत्यार, 2 प्रेशर कुकर, वायर बंडल, 2 वाॅकीटाॅकी, कॅमेरा, 20 पिट्टू, व इतर नक्षल साहित्य मोठया प्रमाणात जप्त केले आहे. शासनाने मृतक नक्षलवाद्यावर 8 लाखाचे बक्षीस ठेवले होते.
सी- 60 जवानांनी जहाल नक्षली सोमा उर्फ शंकर याला कंठस्नान घातल्याने सी -60 जवानांच्या शौर्याचे कौतूक केले आहे. तसेच पोलीस जवानांना रोख पारितोषीक जाहीर केले आहे.


