➤ आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश ; सात दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद

राजुरा : राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे २ लाख ६३ हजार रुपये आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी वेल्डिंग कामगार प्रियदर्शन आयुधरोष विश्वास (रा. प्रतिक कॉलनी, भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर) यांनी राजुरा तहसील कार्यालय परिसरातून त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७२/२०२६, कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे साहील वसंत टेकाम (वय २०) आणि चेतन दिनेश मिलमिले (वय २१, दोघेही रा. इंदिरानगर, चुनाळा, ता. राजुरा) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी राजुरा, रामनगर, कोरपना तसेच तेलंगणातील वांकोडी परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून त्यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि इतर वाहनांचा समावेश आहे.



