चंद्रपुर

धान्य किटसचे वितरण सरकारी यंत्रणेमार्फत पारदर्शिपणे करा-खा.धानोरकर

चंद्रपूर (का.प्र.) कोरोना विषाणू प्रादुर्भाव उपाययोजना, नियंत्रण व गरीब गरजू लोकांना धान्य व किराणा वाटपचे नियोजनाबाबत चर्चेकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा नियोजन समिती, खनिज विकास निधी व मंजूर शासकीय निधीचे वाटप अत्यंत पारदर्शीपणे कोणत्याही राजकीय पक्षांचा किंवा लोकप्रतिनिधीचा सहभाग न करता फक्त सरकारी यंत्रणेमार्फत करावे, अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना केली. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, भद्रावतीचे नगराअध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले यांची उपस्थिती होती. . खनिज विकास निधीतून ११ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात बिना रेशन कार्डधारकांची संख्या ४०००० आहे. त्या कुटूंबांना या निधीतून धान्यपुरवठा किट व अंत्योदय कार्डधारकांना धान्य शासनाकडून देण्यात आला. तसेच किराणा किट्स देण्यात येत आहेत. या सर्व याद्या तपासणी करून शासकीय यंत्रणेमार्फ़त वाटण्यात याव्या, अशी सूचना खासदार महोदयांनी दिली. ऑटोचालक व काळीपिवळी धारकांची आर्थिक समस्या पाहता त्यांची देखल आरटीओ मार्फत यादी मागवून प्राधान्याने त्यांचे कुटूंबियांपर्यंत या किट्स पोहोचविण्याचे सुचना त्यांनी दिली. या बैठकीत आमदार सुभाष धोटे यांनी परराज्यात अडकून पडलेल्या कामगारा बांधवांना परत आणण्यासाठी त्वरित कारवाई व्हावी, अशी अपेक्षा केली. ही बाब आपत्ती व्यवस्थापन मार्फ़त प्रयत्नात अजून लवकरच या कामगारांना आणता येईल, असे प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

बांधकामाच्या परवानगी सोबत अनेक अटी व शर्ती असल्याने त्याबद्दल आमदार धोटे यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात खरीप पिक कर्ज व महिला बचत गटांचे कर्जवाटप करीता सर्व ठिकाणी १०० रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार प्रतिभा धानोरकर व खासदार धानोरकर यांनी केली. यावेळेस विनोद दत्तात्रय, रामू तिवारी इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.