चंद्रपूर(का.प्र.) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रान्तर्गत येणाऱ्या मोहर्ली वन परिक्षेत्रातील सीतारामपेठ परिसरात चार दिवसापूर्वीच वाघीण मृतावस्थेत आढळली होती. दरम्यान रविवारी दुपारी त्याच वाघिणीच्या दोन बछड्यांचा आणि दोन माकडांचा मृतदेह कोंडेगाव तलावाजवळ आढळून आल्याने ताडोबा व्यवस्थापनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. वाघिणीच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कक्ष क्र.९५६ मध्ये कोंडेगाव तलावापासून २०० मीटर अंतरावर वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.बछड्यांचे वय अंदाजे १ वर्ष असून त्यांच्या जवळच दोन माकडांचा देखील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.सदर घटनेची माहिती गस्तीवर असलेल्या क्षेत्र सहाय्यक डी.ए. राऊत यांनी वरिष्ठाना दिल्यानंतर ताडोबाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी घटनास्थळी भेट दिली. बुधवारी मृतावस्थेत मिळालेल्या वाघिणीचेच हे दोन बछडे असल्याची माहिती
त्यांनी दिली.




