
। सुकमा , दि. २२ । देश कोरोनाच्या महामारीशी सामना करत असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधत छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला केला आहे. सुकमामध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत तर १४ जवान जखमी झाले आहेत. काल शनिवारी सुकमामधील qचतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरुन परतत होते. या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. यातील १२ जवान डीआरजीचे तर ५ जवान हे एसटीएफचे असल्याची माहिती आहे. यापैकी जखमींना शनिवारी रात्री उशीरा या जखमी जवानांना एअरलिफ्ट करुन रायपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.
सुमारे ३०० डीएआरजी आणि एसटीएफचे जवान या भागात एका कामगिरीवर निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी नक्षलवाद्यांनी जवानांना घेरले. त्यानंतर नक्षली आणि जवानांमध्ये तब्बल तीन तास ही चकमक सुरु होती. यानंतर नक्षलवादी इथून पळून गेले. घनदाट जंगल आणि वातावरणाची स्थिती खराब असल्याने या जवानांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. ड्रोनच्या मदतीने जवानांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, शनिवारी रात्री डीजीपी डीएम अवस्थी यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेबाबत माहिती दिली.




