चंद्रपुर जिल्हा

686 मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे नागभीडमध्ये दाखल


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपलब्ध केल्या 25 महामंडळांच्या बसेस
 चंद्रपूरसह गडचिरोली, गोंदीया, नागपूरच्या श्रामिकांचा सहभाग
 मजुरांसाठी भोजन व आरोग्याची व्यवस्था
 14 दिवस होमकॉरेन्टाइन राहण्याचे निर्देश
 मजुरांनी जिल्हा प्रशासनाचे मानले आभार
चंद्रपूर, दि. 8 मे: लॉकडाऊनमुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात अडकलेल्या चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील 780 मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे आज सकाळी 9 वाजता नागभिड येथे पोहोचली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी याठिकाणी 25 एसटी बसेस उपलब्ध करून यामजुरांना आपापल्या गावाकडे मोफत जाण्याची व्यवस्था केली. चंद्रपूर जिल्ह्यात ही दुसरी रेल्वे कालपासून आंध्र प्रदेश व तेलंगणातून पोहोचली आहे.
राज्य व राज्य बाहेर अडकून पडलेल्या नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी स्पष्ट केले होते. आज जिल्ह्यात आलेल्या 686 मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी मजुरांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी व्यवस्था केली.
या सर्व नागरिकांना शारीरिक अंतर राखण्याच्या अटीसह 25 एसटी बसने रवाना करण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय एसटी बसेस याठिकाणी उपलब्ध झाल्या. यावेळी मजुरांना फुड पॅकेट, मास्क, सॅनीटायझर, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी 9 वाजता शासन-प्रशासन यांच्यावतीने करण्यात आलेल्या या सुविधांबद्दल गेल्या 40 दिवसांपासून लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *