चंद्रपुर

होम क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

चंद्रपूर (का.प्र.) – सिकंदराबाद शहरातून चंद्रपूर शहरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर माहिती लपविणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188, 269,270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे 51(बी), साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अंतर्गत सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १९ जून रोजी सिकंदराबाद येथुन रेल्वेने सदर व्यक्ती व त्याचे काका चंद्रपूर मध्ये दाखल झाले होते. मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे प्राथमिक तपासणी करून शकुंतला लॉन येथे पुढील तपासणी व नोंदणी करीता नेण्यात आले. नोंदणी दरम्यान पठाणपुरा निवासी सदर व्यक्तीने आपला राहण्याचा पत्ता बिनबा गेट येथे सांगितला. मनपा प्रशासनाद्वारे होम क्वारंटाईन केले असता सदर व्यक्ती कोविड सदृश्य लक्षणे जाणवल्याने मनपा आरोग्य विभागाला माहिती न देता गृह अलगीकरणाचे नियम मोडून परस्पर एका खाजगी डॉक्टरकडे तपासणीकरीता गेला. त्या खाजगी डॉक्टरांनी तपासणीकरीता आलेल्या सदर रुग्णाची माहिती मनपाला दिली. आरोग्य विभागाद्वारे या व्यक्तीचा स्वॅब नमुना घेऊन तपासणीकरीता याआधीच पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या गरोदर पत्नीचाही स्वॅब नमुना घेऊन तपासणीकरीता पाठविला असता सदर अहवालदेखील पॉझिटीव्ह आला. खाजगी डॉक्टरचा स्वॅब अहवाल निगेटीव्ह आला असुन त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आह . मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे सदर व्यक्तीकडे भेट दिली असता तो गृह अलगीकरणात आढळुन आला नाही त्यामुळे मनपा प्राथमीक आरोग्य केंद्र क्र. ३ च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया खेरा यांच्याद्वारे ही संपुर्ण माहिती सिटी पोलीस स्टेशनला देण्यात आली असून यानंतर पोलीस स्टेशन मध्ये प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून सार्वजनीक धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य जाणीवपुर्वक केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी रीतसर परवानगी घेऊनच जिल्ह्यात प्रवेश करावा तसेच प्रवेश केल्यानंतर लगेच महानगरपालिकेला अचूक माहिती द्यावी, प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची समज वारंवार मनपा प्रशासनाद्वारे देण्यात येत असुन पालन न करण्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.