![]()
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचा पदग्रहण सोहळा
चंद्रपूर :- लोकांच्या सहभागातून लिग तयार करून महाराष्ट्रात पहिल्यांदा चंद्रपुरात स्वच्छता अभियानांतर्गत स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेत ४५ समूहांनी सक्रीय सहभाग नोंदवून स्वच्छतेला हातभार लावला. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने अत्यंत कठीण भागाची निवड करून त्याचा कायापालट करून दाखवित सौंदर्यीकरण केले. ही बाब चंद्रपूरकरांच्या मनात घर करून बसली असून, भविष्यात चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून चंद्रपूर शहर महानगरपालिका शहरात वृक्षारोपण मोहीम राबविणार असल्याची माहिती मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिली. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शिवजयंतीदिनी भारती हॉस्पीटलच्या सभागृहात पार पडला. या सोहळ्यादरम्यान पदाधिकारी व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना आयुक्त पालिवाल बोलत होते. चंद्रपूर शहर स्वच्छ व सुंदर होण्याच्या दृष्टीने स्वच्छता लिग स्पर्धा राबविण्यात आली होती. या स्पर्धेत चंद्रपूर बचाव संघर्ष समितीनेही हिरीरीने भाग घेवून सक्रीय सहभाग घेतला होता. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योगा शिबिरांचे आयोजनही शहरात केले जात आहे. यामध्येही चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा असून, मनपाच्या प्रत्येक उपक्रमात ही सामाजिक संस्था सक्रीय भाग घेत असून, भविष्यातही अनेक उपक्रम संयुक्तरित्या राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरात प्रदूषणाची गंभीर समस्या असून, येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाणार आहे. ही मोहीम सीबीएसएसच्या माध्यमातून राबविली जाणार असून, पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करण्यासाठी शहरातील ठिकाणांची नावे सुचवावी, असे आवाहनही आयुक्त विपीन पालिवाल यांनी केले.
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांच्या अध्यक्षतेखाली हा पदग्रहण सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंचावर मनपा आयुक्त विपीन पालिवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके, सीबीएसएसचे महासचिव मधुसूदन रूंगठा उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर अनेकांनी प्रकाश टाकला. मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी स्वच्छता लिग, योगा शिबिर व भविष्यातील सामाजिक उपक्रमांसाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीची मदत घेणार असल्याचे सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कारासाठी नाही तर योगदानासाठी हिरीरीने भाग घेतला जातो, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. दरम्यान, स्वच्छता लिग स्पर्धेत सलग ३० दिवस स्वच्छतेसाठी श्रमदान व इतर उपक्रमातून योगदान देणाऱ्या सीबीएसएसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा भेटवस्तू देवून आयुक्त पालीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सन २०२३-२४ या वर्षासाठी सीबीएसएसच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून डॉ. गोपाल मुंधडा यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली असून, महासचिवपदी मधुसूदन रूंगठा तर कोषाध्यक्ष म्हणून विलास माथनकर यांची निवड करण्यात आली. ८ उपाध्यक्ष, ८ सचिव, ८ संघटन सचिव तर इतरांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना आयुक्त पालिवाल यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वनश्री मेश्राम यांनी केले. अमोल राऊत यांनी महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाऊन शिवरायांना अभिवादन केले.




