चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पात 75 हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी

चंद्रपूर – शाळकरी मुलांना जंगल आणि त्यातील वन्यप्राण्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, जैवविविधता कळावी, निसर्गाप्रती प्रेम निर्माण व्हावे यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पात 75 हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी घडवून आणणार असल्याची माहिती राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गुरूवारी सायंकाळी चंद्रपूर प्रेस क्लबच्या पत्रकारांशी ते चर्चा करीत होते. जगात केवळ 14 देशांमध्ये वाघ शिल्लक असून, त्यात भारत अगे्रसर आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 203 आहे. अधिवास आणि वाघांच्या स्थलांतरणासाठी यथायोग्य मार्ग असल्याने येथील वाघ उन्नत होत आहेत. त्यांना उत्तम पोषण येथे आहे. त्यामुळे राजबिंडे दिसतात. असे वाघ विद्यार्थ्यांना बघता यावे, त्यांच्यात जंगलाप्रती प्रेम,आपुलकी निर्माण व्हावी, वन्यजीवांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी यासाठी75 हजार शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत जंगल सफारी घडवून आणणार असे मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. ताडोबा, नवेगांव नागझीरा, उमरेड-कर्‍हांडला, मेळघाट या व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांना ही सफारी घडवून आणली जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना वने व वन्यप्राण्यांवर आधारित लहानशी पुस्तिका, टी शर्ट, पेन, नोटबुक, चहा, नास्ता व इतर साहित्य पुरवण्यात येणार आहे. या योजनेचा आराखडा तयार झाला आहे. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले. अशी योजना केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या शाळकरी विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवली गेली. सात हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *